कोल इंडियाची कंपनी असल्याचे भासवून बेरोजगार युवकांची फसवणूक : संकेतस्थळांवरून तब्बल ८८ हजार ५८५ पदांची जाहिरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
कोल इंडियाची कंपनी असल्याचे भासवून एका कंपनीने सरकारी लोगोचा गैरवापर करीत बनावट संकेतस्थळांवरून तब्बल ८८ हजार ५८५ पदांची जाहिरात दिली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठया संख्येत पदभरती असल्याने मोठया संख्येत सुशिक्षित तरुणांनी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरला. मात्र, काहींना शंका आल्याने खोलवर तपासणी केली असता हे संकेतस्थळच बनावट असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे कोल इंडिया लिमिटेडप्रमाणेच हुबेहुब सरकारी लोगो वापरून ‘एससीसीएलसीआयएल’ अशी कंपनीने २५ जुलैला ही जाहिरात दिली.
नागपुरातील एका अर्जदार असलेल्या विद्यार्थ्यांने या संकेतस्थळाची माहिती घेत थेट कोल इंडियाच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. कोल इंडियाचे चेअरमन ए. के. झा यांनी या नावाची कोल इंडियाची कुठलीही कंपनी नसल्याचे स्पष्ट करीत, या कंपनीपासून आणि काढण्यात आलेल्या रिक्त पदांच्या भरतीपासून अर्जदारांनी सावध राहावे असे आवाहन केले आहे. नागपुरातून या पदांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी चालानद्वारे ऑनलाईन शुल्क भरले आहेत. देशभरातून यासाठी अर्ज आले असतील. त्यामुळे या बनावट कंपनीने आतापर्यत बेरोजगार युवकांची कोट्यवधीने फसवणूक केल्याचे उघडकीस येत आहे. नागपुरातील सुबोध चहांदे या तरुणाने SCCLCIL.in या संकेतस्थळाला भेट दिली असता त्याला ही कंपनी बोगस असल्याची शंका आली. नंतर सुबोधने थेट कोल इंडियाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार पुढे आला.   Print


News - Nagpur | Posted : 2019-08-21


Related Photos