महत्वाच्या बातम्या

 रेशीम दरमहा शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा उद्योग : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- आरसेटीच्या रेशीम शेती प्रशिक्षणाला भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांना दरमहा शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा तसेच इतर पारंपरिक पिकांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त प्रशिक्षण न घेता या व्यवसायामध्ये उतरून यशस्वी वाटचाल करावी व इतर शेतकऱ्यांना सुद्धा रेशीम शेती करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (आरसेटी) रेशम कोष उत्पादक उद्यमी प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक उदय राऊत, रेशीम शेतीचे तज्ञ प्रशिक्षक व निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, जिल्हा रेशीम कार्यालयाचे ज्ञानेश्वर भैरम व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना रेशीम शेतीबद्दल अद्ययावत व शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्यामुळे ते रेशीम शेती करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील. आपला जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा असून कापूस, सोयाबीन, तूर अशी पारंपरिक पिके घेतली जातात. बदलत्या हवामानामुळे व शेतीतील वाढत्या उत्पादन खर्चामुळे पारंपरिक पिकांमध्ये अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांबरोबरच रेशीम शेती उद्योग सुरु करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) वर्धा येथे १० दिवसीय रेशम कोष उत्पादक उद्यमी या विषयावरील प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे असून यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागामधून आलेल्या शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम शेती लागवडीखालील क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचीच फलश्रुती म्हणून सदर प्रशिक्षण पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये आरसेटी मार्फत सुरु करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी भेट देऊन संस्थेची पाहणी केली. यावेळेस संस्थेचे संचालक उदय राऊत यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना संस्थेमार्फत सुरु असलेल्या स्वयंरोजगार क्षेत्रातील कामाबद्दल माहिती दिली.





  Print






News - Wardha




Related Photos