महत्वाच्या बातम्या

 महानाट्यासाठी प्रशासनाची तयारी जोरात : नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस प्रयोग


- यशवंत स्टेडियमवर होणार महानाट्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपुरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या प्रशासनाची तयारी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानंतर तयारीला वेग आला आहे.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला प्रयोग नागपूर येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जाणता राजा मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले  आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज  सायंकाळी पाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण  कलाकार करणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

यानंतर राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या नेहरू मैदानात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारीदरम्यान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos