सीआरपीएफ जवानांमुळेच देशाचे नागरिक सुरक्षीत : नगराध्यक्षा योगिता पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
जनतेचे रक्षण हे जवानांचे कर्तव्य आहे. आपल्या परिवारापासून दुर राहून जवान देशाचे रक्षण करीत असतात. प्रत्येक सणाला त्यांना परिवाराची आठवण येते. मात्र देशाच्या सेवेसाठी जवान सदैव तत्पर असतात.  सीआरपीएफ जवानांमुळेच देशाचे नागरिक सुरक्षीत आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
सीआरपीएफ कॅम्प एमआयडीसी रोड गडचिरोली येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या. 
नगराध्यक्षा योगिता पिपरे तथा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते जवळपास १०० सीआरपीएफ जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी जवानांना मिठाई वाटण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प.च्या शिक्षण सभापती वर्षाताई बट्टे, पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका लता लाटकर, नगरसेविका रंजना गेडाम, नगरसेविका रितुताई कोलते, अनुराग पिपरे, सीआरपीएफ डेप्युटी कमांडट सपन सुमन, सीआरपीएफ डेप्युटी कमांडट कैलास गंगावन उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, सीआरपीएफ जवान आपल्या परिवरापासून दूर असतात. त्यांना प्रत्येक सण आपल्या कुटुंबांसोबत साजरे करायला मिळत नाही. त्यामुळे जवानांचा आनंद वाढविण्यासाठी सीआरपीएफ कॅम्प येथे जवानांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. जनतेचे रक्षण करतांना जवान आपल्या प्राणाची पर्वा करीत नाही. त्यामुळे अशा शूरवीर जवानांना राखी बांधून भावा-बहीणीचे नाते घट्ट करण्यात आले आहे, असेही नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या.
सीआरपीएफ डेप्युटी कमांडंट सपन सुमन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, सीआरपीएफ जवान गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असून त्यांना नगराध्यक्षा योगिता पिपरे व नगरपरिषद गडचिराली येथील नगरसेविकांनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. त्यामुळे आम्हाला रक्षाबंधन उत्साहात साजरा केल्याचा समाधन मिळाला. आम्हाला गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा बहीणींचे  प्रेम मिळाले. त्यामुळे खुप आनंद झाला.  यावेळी सीआरपीएफ जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-20


Related Photos