जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी एटापल्ली येथील आंदोलनाची घेतली दखल, शिक्षण समितीच्या बैठकीत घेतले विविध निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली येथे जनहितवादी संघटना तसेच नागरीकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी बसस्थानकासमोर विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान समस्या जाणून घेतल्या होत्या. या समस्यांची सोडवणूक करण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली असून आज २० ऑगस्ट रोजी झालेल्या शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत त्यांनी विविध निर्णय घेतले आहे. एटापल्ली येथे जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. 
जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ज्या जि.प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत अशा हायस्कूलमध्ये तासिक तत्वावर नियुक्ती करण्यात यावी तसेच रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे असे निर्देश दिले. पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत माॅडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा घडवून आणली. या ठरावाला मंजूरी प्रदान करण्यात आली. याबाबत तत्काळ शासनास पाठपुरावा करण्याच्या सुचना कंकडालवार यांनी दिल्या. एटापल्ली येथील जि.प. शाळेला संरक्षण भिंत उभारण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच या बैठकीमध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. डिजीटल शाळांच्या बाबीवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-20


Related Photos