बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंध साठी व्हीएसटीएफ आणि युनिसेफ यांची विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
महाराष्ट्र ग्राम परिवर्तन प्रतिष्ठान (- MVSTF) आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखा (United Nations International Children's Emergency Fund - UNICEF) यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क कराराची त्रितपपूर्ती यांचे औचित्य साधून "बालहक्कांचा सन्मान" ही बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्दिष्टाने आखलेली मोहीम सुरु केली आहे. 
३० वर्षांपूर्वी जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन "संयुक्त राष्ट्रांची बालहक्क विषयक सनद" या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय दस्त करारावर स्वाक्षऱ्या  केल्या. हा मानवी हक्क क्षेत्रात सर्वाधिक मान्यता मिळविणारा करार ठरला आहे आणि जगभरातील बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठीचा मार्गदर्शक दस्त ऐवज मानला गेला आहे. या कराराचे बालहक्क रक्षण  हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून  MVSTF आणि UNICEF यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.  महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांतील ८५० गावांमध्ये तीन महिने चालणारी ही मोहीम मुख्यतः लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देईल. या मोहिमेसाठी संकल्पना  आणि माहिती ने विकसित केली आहे तर ती प्रत्यक्ष लोकांपर्यंत नेण्याचे काम  MVSTF करणार आहे.  
या मोहिमेचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा १५ ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळातील गावक-याना या समस्यांची माहिती दिली जाईल. यासाठी ग्रामसभा भरविल्या जातील.  अशा सभांमध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले जातील.  तसेच मुख्यमंत्री ग्राम विकास कार्यकर्ता योजनेचे  कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्षेत्रातील  गावांमध्ये बालहक्क रक्षण समित्या स्थापन होऊन त्यांचे कार्य सुरु होण्यासाठी प्रयत्न करतील. हे प्रतिनिधी १४व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार एकूण निधीच्या १० टक्के रक्कम महिला आणि बालकांच्या योजनांसाठी राखून ठेवली पाहिजे याची जाणीव निर्माण करतील आणि हा निधी योग्य कारणांसाठी खर्च होत आहे याकडे लक्ष ठेवतील. बालकांच्या  सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठीही या पहिल्या टप्प्यात प्रयत्न होतील. हा टप्पा ३० ऑगस्ट पर्यंत चालेल.  
दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर ला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु होईल. यामध्ये "बेटी बचाओ बेटी पढाओ" या योजनेच्या अमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाईल.  बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या जातील तसेच बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली जाईल. युनिसेफ चे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी होतील आणि गावक-याना या विषयाचे महत्व पटवून देतील तसेच वाढत्या वयानुसार मुलांच्या वागणुकीत होणा-या बदलांची माहिती देतील.  युनिसेफ ने तयार केलेली माहितीपत्रके, पुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना दिल्या जातील तसेच बालहक्क रक्षण आणि बालविवाह या विषयांवर तयार केलेले माहितीपट दाखविले जातील. 
तिसरा टप्पा १४ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सुरु होईल.  या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासाठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल. यासाठीची साह्यसेवा मिळवण्यासाठी तसेच तक्रार नोंदविण्यासाठीच्या दूरध्वनी क्रमांकांची त्यांना माहिती दिली जाईल.  
MVSTF चे मुख्य कार्यकारी अधिकारी   रामनाथ सुब्रमण्यम म्हणाले, "ही मोहीम यशस्वी होऊन तिचा विस्तार व्हावा आणि दोन्ही विषयांची अगदी सर्वसामान्य गावक-याना सर्वंकष माहिती मिळावी यासाठी युनिसेफ ला आम्ही संपूर्ण सहकार्य देत आहोत. युनिसेफ बरोबरच्या या संयुक्त प्रयत्नांमधून अनेक उपक्रम हाती घेतले जात असून त्यांमुळे ग्रामीण भागात लोकांचे सक्षमीकरण होत आहे. या ताज्या मोहिमेचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात बालहक्क आणि बालविवाह या मुद्द्यांविषयी भविष्यात योग्य कृती करण्याची मानसिकता ग्रामीण भागात पक्की होईल.”
युनिसेफ च्या महाराष्ट्र कार्यालयाच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या, " बालहक्क विषयक प्रयत्नांसाठी भागीदार म्हणून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क विषयक करारात १९ व्या कलमात नमूद केलेल्या "बालकांना सहन करावी लागणारी हिंसा, गैरवर्तन आणि दुर्लक्ष" या समस्यांवर युनिसेफ चा भर आहे. MVSTF बरोबरच्या भागीदारीमुळे बालविवाह रोखण्यासाठी योग्य मानसिकता आणि वातावरण निर्माण होईल आणि प्रत्येक बालकाचे काही हक्क आहेत याची जाणीव पसरेल." 
  Print


News - Wardha | Posted : 2019-08-20


Related Photos