विदर्भ निर्माण महामंच विदर्भातील ६२ पैकी ४० मतदारसंघात उमेदवार उभे करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
विदर्भ निर्माण महामंचने विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ पैकी ४० मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.  नागपूर शहरातील सहापैकी तीनच जागांवर उमेदवार राहतील, असा निर्णय घेतला आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात उमेदवार नाही. 
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भवनात बैठक झाली.या बैठकीला  समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष राजेश काकडे, सरचिटणीस चंद्रभान रामटेके, शंकर बर्मन, रोहित शाहू, प्रभाकर काळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रा. रमेश पिसे, प्रेम म्हैसकर, हरिकिशन हटवार उपस्थित होते. यात ४० जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
विदर्भ निर्माण महामंचमध्ये आधी एक डझनहून अधिक पक्ष व संघटनांचा समावेश होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर यातील अनेक पक्ष व संघटना बाहेर पडल्या. विदर्भातील ४० विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामंचचे घटक पक्ष व संघटनांच्या नेत्यांची परत बैठक होणार आहे. यात कोणता मतदारसंघ कुणासाठी सोडायचा, यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे महामंचचे समन्वयक राम नेवले यांनी सांगितले.
नागपूर  जिल्ह्यातील  काटोल, सावनेर, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड, नागपूर शहर - पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर, अमरावती जिल्ह्यातील  अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, धामणगाव, वर्धा जिल्ह्यातील  हिंगणघाट, आर्वी, देवळी-पुलगाव, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील  वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, आकोट, पूर्व अकोला, मूर्तिजापूर, वाशीम जिल्ह्यातील  रिसोड, बुलडाणा जिल्ह्यातील  खामगाव, चिखली, सिंदखेडराजा, गडचिरोली जिल्ह्यातील  आरमोरी, अहेरी, गोंदिया जिल्ह्यातील  तिरोडा ,  चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, वरोरा आणि  भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर हे मतदार संघ लढविण्याची तयारी आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा मतदारसंघातून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांची जोरदार तयारी असल्याचे दिसून येत आहे. 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-20


Related Photos