पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केल्या महत्त्वाच्या घोषणा
वृत्तसंस्था /  मुंबईः
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या.  पूरग्रस्त भागातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकासाठीचे कर्ज माफ करण्यात येणार असून, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येणार आहे. 
घराची पडझड झालेल्यांना घरेही बांधून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची मदत घेतली जाईल आणि केंद्राकडून मिळणाऱ्या निधीसोबत राज्य शासनातर्फे एक लाख रुपये दिले जातील. बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात २४ हजार आणि शहरी भागात ३६ हजार रुपयेही देण्यात येणार आहेत. 
जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती. समितीची बैठक सोमवारी वर्षा बंगल्यावर झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-20


Related Photos