महत्वाच्या बातम्या

 पारंपारिक कौशल्य कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- योजनेच्या जनजागृतीकरीता कार्यशाळा

- १८ प्रकारच्या कारागिरांना प्रशिक्षण व कर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत पारंपारिक १८ प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज सुविधेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांना लाभ मिळावा यासाठी विकास भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य विकास सुविधा अधिकारी डोईफोडे, राष्ट्रीय सुकाणू समितीचे नामनिर्देशित सदस्य सुमित वानखडे, राजेश बकाने, सुनील गफाट आदी उपस्थित होते.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, व्यवसाय साहित्य, कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे आणि तारणमुक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी बायोमेट्रीक प्रमाणीकृत आधारीत प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टलद्वारे सामान्य सेवा केंद्राद्वारे केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

पारंपारीक १८ प्रकारच्या कारागीरांना आत्मनिर्भरता आणि समृध्द व सशक्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सुतार, लोहार, कुंभार, मुर्तीकार, चर्मकार, राजमिस्त्री, न्हावी, धोबी, शिंपी, मासेचे जाळे बनविणे, बुरड उद्योग, फुलांच्या माळी तयार करणाऱ्या अशा १८ पारंपारीक उद्योग कारागीरांना याचा लाभ घेता येईल. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ग्रामंपचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे राहुल कर्डिले यांनी केले.

या योजनेंतर्गत पारंपारीक कारागीरांना प्रशिक्षण देण्यात येईल व प्रशिक्षण कालावधीत ५०० रूपये प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. योजनेतून सुरुवातीला १ लाख, त्यानंतर २ लाख व नंतर ५ लाख रुपयाचे कर्ज ५ टक्के व्याज दराने दिल्या जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९५९ कारागिरांनी नोंदणी केली आहे यावेळी डोईफोडे यांनी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, विश्वकर्मा योजनेची नोंदणी केलेले कारागिर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos