भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर व्ही. बी. चंद्रशेखर यांची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या


वृत्तसंस्था / चेन्नई :  भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर आणि निवड समितीचे माजी सदस्य व्ही. बी. चंद्रशेखर यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पोलिसांच्या या माहितीमुळे चंद्रशेखर यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. 
चंद्रशेखर यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्जाची मोठी रक्कम देणे असल्यामुळे चंद्रशेखर हे खूप तणावाखाली होते. त्यांची प्रकृतीही वेगाने ढासळत होती व ते खूप अशक्त झाले होते, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली. तमिळनाडू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमधील व्ही. बी. कांची विरन्स या संघाची मालकी चंद्रशेखर यांच्याकडे होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे निकटवर्तीय म्हणून चंद्रशेखर ओळखले जात होते. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीला श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे आणण्यात चंद्रशेखर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तमिळनाडूतील क्रिकेट विश्वाला त्यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. 
चंद्रशेखर हे १९८८ ते १९९० दरम्यान भारतातर्फे सात आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेट सामने खेळलो होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना केवळ ८८ धावाच जमवता आल्या असल्या, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र त्यांनी ८१ सामन्यांत ४,९९९ धावा केल्या होत्या. १९८७-८८ मध्ये रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या तमिळनाडू संघाचे ते सदस्य होते. दरम्यान, बीसीसीआयसह सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, कृष्णम्माचारी श्रीकांत या माजी खेळाडूंनी, तसेच सुरेश रैना, हरभजन सिंग या चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंनी चंद्रशेखर यांच्या मृत्यूबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-17


Related Photos