जड वाहतूकीमुळे सेमाना बायपास मार्गाची लागली वाट!


- मार्गावरील गिट्टी उखडली, लहान वाहनधारकांना त्रास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
सेमाना ते जिल्हा न्यायालयापर्यंत जाणाऱ्या  बायपास मार्गावरून सध्यास्थितीत मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन सुरू असल्यामुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून गिट्टी पूर्णतः उखडली आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चामोर्शी मार्गावरून काॅम्प्लेसकडे जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र सध्या शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने चंद्रपूर मार्गावरून जाणारी जड वाहनेसुध्दा चामोर्शी मार्गाने होउन सेमाना बायपास मार्गे चंद्रपूर मार्गाला काढली जात आहेत. यामुळे जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच रविवारी आठवडी बाजार राहत असल्यामुळे वाहतूकीची कोंडी होउ नये यासाठी अनेक वाहने याच मार्गाने वळविली जातात. पावसामुळे सध्यास्थितीत गडचिरोली शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून सेमाना बायपास मार्गही संपूर्ण खराब झाला आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडली आहे. जड वाहनांमुळे या मार्गावर प्रचंड धुळीचासुध्दा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-16


Related Photos