महत्वाच्या बातम्या

 मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी शंभर कुटुंबामागे एका प्रगणकाची नेमणूक : जिल्हाधिकारी विपीन इटनकर


- चार दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन
- तालुकास्तरावर तहसिलदार इन्सिडंट कमांडर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. १०० कुटुंबामागे एका प्रगणकाची नेमणूक करीत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचे काम चार दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.

राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी हे निर्देश दिले.

शंभर कुटुंबामागे एक प्रगणक नेमा. या संपूर्ण सर्वेक्षण मोहीमेचे तालुकास्तरावर तहसिलदार इन्सिडंट कमांडर असून त्यांना प्रगणक नेमणूक करण्याचे अधिकार असणार आहेत. तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल, शिक्षक, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आवश्यक प्रगणकांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार त्यांना असतील. यासोबतच गरजेनुसार राखीव कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात यावा. सर्वेक्षणाची चुकीची माहिती समाजमाध्यमांवरून प्रसारित करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

गोखले इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेकडून सर्वेक्षणाच्या कामकाजासाठीचे सॅाफ्टवेअर तयार करण्यात येत असून हे सॅाफ्टवेअर युजर फ्रेंडली असणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती हॅन्डहेल्ड डिव्हाईसद्वारे बहुपर्यायी स्वरूपात प्रगणकांनी भरायची आहे. जिल्हास्तरावर मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याद्वारे सर्व प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे काम सुलभ व जलद गतीने व्हावे यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॅा. सुनील लहाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 





  Print






News - Nagpur




Related Photos