बेडफोर्ड ते शिवशाही लालपरीच्या परिवर्तनाचे रंजक प्रदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
प्रवाशांच्या जिवाभावाची एसटी बस अनेक परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. प्रवाशांना आपल्या गंतव्य ठिकाणी हमखास पोहचविणारी  एसटी आजही सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे साधन आहे. या बसचा प्रवास अतिशय रंजक असून एसटीने आपल्यामध्ये काळानुरुप मोठया प्रमाणात  बदल घडून आणले आहेत. बेडफोर्ड ते शिवशाही असा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या लालपरीची माहिती देणारे प्रदर्शन प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे, अशी माहिती प्रभारी विभाग नियंत्रक गजानन नागुलवार यांनी दिली.
वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन बुधवार १४  ऑगस्ट रोजी मुख्य बसस्थानक भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून गजाजन नागुलवार बोलत होते. वारी लालपरीची या फिरत्या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांच्या हस्ते करण्यात आले. लालपरी नावाने प्रसिध्द असलेल्या एसटी बसचा इतिहास व प्रवास नागरिकांना तसेच प्रवाशांना माहित व्हावा यासाठी वारी लालपरी हे फिरते प्रदर्शन महाराष्ट्र भर दाखविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
१९४८  साली बेडफोर्ड यानावाने एसटीने प्रवाशांची सेवा सुरु केली. १९७०  मध्ये एसटी वातानुकूलित करण्यात आली. १९८२  मध्ये एशियाड, १९९०  मध्ये सुपर डिलक्स, २००६  मध्ये परिवर्तन बस, २०१५  मध्ये हिरकणी, २०१७  मध्ये शिवशाही असा प्रवास करीत एसटी २०१९  मध्ये शयनयान रातराणी झाली. या सगळया प्रवासाची माहिती व मांडणी या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. सीसीटीव्ही, इंद्रधनुष्य आरक्षण प्रणाली, स्मार्ट कार्ड, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजना, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास, मानव विकास अंतर्गत मुलींसाठी मोफत प्रवास, यशवंती सेवा, 145 बस स्थानकाचे नुतनीकरण या सारख्या विविध योजना एसटीने पाहिल्या आहेत.
हे प्रदर्शन एसटीच्या काळानुरुप परिवर्तनाचे साक्षीदार ठरले आहे. या प्रदर्शनात एसटीच्या विविध टप्प्याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदर प्रदर्शन राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बस फॉर अस फाऊंडेशन यांनी अतिशय मोहक पध्दतीने मांडले आहे. आपल्या एसटीच्या मागील पाच वर्षातील अमुलाग्र बदल प्रवासी वर्गाला कळावा, एसटीच्या प्रवाशी सेवेचे अंतरंग उलगडून बघता यावे, या उद्देशाने बसस्थानकामध्ये सामान्य नागरिक, विद्यार्थी  तसेच प्रवाशांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी बसस्थानकावर मोफत उपलब्ध होते.
प्रमुख्य पाहुण्यांचे गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आले. तसेच बस फॉर अस फाऊंडेशन चे रोहित धेंडे, सयम धारव, सुशांत अवसरे, रवि मळगे व तनय दांडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाप्रसंगी विभागीय अधिकारी चंद्रकांत वडस्कर, विभागीय सांख्यिकी अधिकारी अमरदास डाबरसे, विभागीय कर्मवर्ग अधिकारी शैलेद्र भारती, विभागीय लेखा अधिकारी सुरेंद्र वाघधरे, विभागीय लेखा अधिकारी तथा समन्वय अधिकारी भारती कोसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सहाय्यक वाहतुक अधिक्षक सारिका निमजे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाहतुक निरिक्षक सुनिल जिभकाटे यांनी केले.  
  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-14


Related Photos