शाळेला जा म्हणून आई रागावल्यामुळे, पंधरा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन केली़ आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सोलापूर : 
तीन दिवस सुट्टी असल्यामुळे घरातच आहेस, आज शाळा सुरू झाली आहे, शाळेला जा म्हणून आई रागावल्यामुळे पंधरा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ कृष्णा विजयकुमार चव्हाण (वय १५, रा. कमलानगर, विजापूर रोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़ 
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेला लागोपाठ तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे कृष्णा हा घरीच होता़ मंगळवारी शाळा असल्यामुळे आईने त्याला शाळेला जाण्यास सांगितले़ मी शाळेला जाणार नाही, असा कृष्णा हट्ट करू लागल्यामुळे आईने रागवले आणि कृष्णाच्या लहान भावाला शाळेला सोडण्यासाठी गेली़ परत आल्यानंतर कृष्णाला हाक मारली तरी त्याने प्रतिसाद दिला नाही़ दरम्यान, कृष्णाने स्वत:ला रूममध्ये बंदिस्त करून घेतले होते़ अनेक वेळा आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने शेजारच्यांना बोलवून दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला़ दरवाजा तोडल्यानंतर कृष्णाने गळफास घेतल्याचे दिसताच आईने टाहो फोडला़  कृष्णाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली़ कृष्णाला एक लहान भाऊ, एक मोठी बहीण आहे़ त्यांचे वडील मुंबईमध्ये खासगी कंपनीमध्ये काम करतात. या घटनेमुळे कमलानगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये झाली असून, पुढील तपास पोलीस नाईक सुरेश लोहार करत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-14


Related Photos