हिरकणी नवउद्योजक योजनेत दहा बचत गटांची निवड


- १५ ऑगस्टला बचत गटांचा सत्कार
- जिल्हास्तरीय सादरीकरणातून निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  महिला बचत गटांना स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करण्याकरीता राज्यात हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय सादरीकणातून 10 महिला महिला बचत गटांची निवड करण्यात आली आहे.
निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास तालुकास्तरीय 50 हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच जिल्हास्तरीय प्रत्येक प्रकल्पास रुपये २ लाख अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. निवड झालेल्या बचत गटांचा 15 ऑगस्टला सत्कार करण्यात येणार आहे.
राज्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविण्यपूर्ण संकल्पनावर आधारीत उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरीता महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 मंजूर करण्यात आले. सदर धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील महिला बचतगटांना स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करण्याकरीता राज्यात हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली. महिला बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पना प्रोत्साहित करण्याकरीता त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, तालुका व जिल्हा स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट नाविण्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थ सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
हिरकणी-नवउद्याजक महाराष्ट्राची या योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्हयाच्या प्रत्येक तालुकास्तरावर तालुकास्तरीय समितीद्वारे २९ व ३० जुलै २०१९ ला बचतगटाच्या नाविण्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. त्यापैकी प्रत्येक तालुक्यात १० बचत गटांची अशा एकूण सात तालुक्यातून ७० स्वयंसहाय्यता बचत गटांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात आली.
 त्याचप्रमाणे तालुका स्तरावर निवड करण्यात आलेल्या बचत गटांचे जिल्हास्तरीय सादरीकरण ७ व ८ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा नाविण्यता परिषद भंडारा यांचे अध्यक्षतेखाली परिषद कक्षात घेण्यात आले व १० बचत गटांची निवड करण्यात आली.
निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास तालुकास्तरीय ५० हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच जिल्हास्तरीय प्रत्येक प्रकल्पास २ लाख रुपये अर्थसहाय्य करण्यात येईल व प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्हास्तरीय बचत गटांचे सादरीकरण करतेवेळी जिल्हा नाविण्यता परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी भंडारा डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सदस्य सचिव तथा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, पोलिस निरिक्षक बी.आर. गाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, कृषी अधिकारी राऊत, डिआरडीएच्या प्रकल्प संचालक मनिषा करसुंगे, नोडल अधिकारी तथा सहाय्यक संचालक कौशल्य विकास विभाग पी. बी. जाधव
यावेळी उपस्थित होते. सदर जिल्हास्तरीय सादरीकरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता राजेंद्र इंगळे, प्रविण पडोळे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-13


Related Photos