मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहर जलमय


- शहराच्या विविध भागात साचले पाणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दोन दिवसांची उसंत दिल्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल १२ ऑगस्ट रोजी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर तसेच सकाळपासून मुसळधार कोसळत आहे. यामुळे गडचिरोली शहर जलमय झाले आहे. प्रचंड पावसामुळे शाळांनीही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे.
शहराच्या विविध भागामध्ये ३ ते ४ फुट पाणी साचले आहे. चामोर्शी मार्गावरील राधे इमारतीसमोर मुख्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरून सध्या वाहतूक बंद आहे. चंद्रपूर मार्गावरील बजाज शोरूम, आयटीआय चौकातही मुख्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. विसापूर मार्ग, आरमोरी मार्ग तसेच अन्य मार्गांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शहरातील अनेक वार्डांमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गडचिरोली नगर परिषदेच्या आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे आवारातील वाहने पाण्यात सापडली आहेत. अनेक नागरीकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. तर तरूण साचलेल्या पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रोवणीची तसेच इतर कामे बंद पडली आहेत. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-08-13
Related Photos