जोरदार टीकेनंतर कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश प्रशासनाने घेतले मागे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : कोल्हापुरातील पूरस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातले पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरु लागले आहे. मात्र आता साथीच्या रोगाचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. मदतकार्याला वेग आला आहे. दरम्यान, राज्य शासनाने पूरग्रस्त कोल्हापूर येथे जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, जोरदार टीका होऊ लागल्यानंतर रात्री उशिरा हे जमावबंदीचे आदेश मागे घेतले आहे. जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर जनतेतून संताप व्यक्त केलेनंतर प्रशासनाने माघार घेतली आहे.
कोल्हापुरात स्थलांतरित पूरग्रस्तांसाठीचे मदतकार्य सुरू झाले आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण आणणाऱ्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लावलेली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. आठवडाभर ठप्प झालेले कोल्हापूरचं जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.
राज्यात पुरामुळे बळी गेलेल्यांची संख्या ४३ वर पोहचली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांला पुराचा फटका बसला असून यामध्ये ४३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर तीन जण बेपत्ता आहेत. पुराचा फटका बसलेल्या ५८४ गावांतील ४ लाख ७४ हजार २२६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांची ५९६ तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
News - Rajy | Posted : 2019-08-13