महत्वाच्या बातम्या

 पदवी विद्यार्थ्यांना ६ आठवडे इंटर्नशिप आवश्यक : इंटर्नशिप पॉलिसीचा मसुदा जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सहा ते बारा आठवड्यांची इंटर्नशिप करावी लागणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी चार ते सहा आठवडे सरकारी, खासगी ना नफा तत्त्वावरील संस्थेत काम करू शकतात.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच इंटर्नशिप पॉलिसीचा मसुदा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना कामाच्या संधी शोधण्याची जबाबदारी त्या-त्या महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारिक कामाचा अनुभव असणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने इंटर्नशिप पॉलिसी जाहीर केली आहे. या पॉलिसीचा मसुदा विद्यापीठाच्या कुलगुरू आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांना माहितीसाठी पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून मसुद्यावर हरकती आणि सूचनादेखील मागविण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच अभियांत्रिकीसाठीही नव्या धोरणानुसार अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केवळ स्वायत्त महाविद्यालयांनी स्वीकारले आहे. त्यापैकी ६२ महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत, बिगर स्वायत्त महाविद्यालये पुढील वर्षी या धोरणाचा स्वीकार करतील अशी अपेक्षा आहे.

इंटर्नशिप सेलची स्थापना -

उच्च शिक्षण संस्थांमध्ये इंटर्नशिप सेल स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात मांडण्यात आली आहे. यात संस्थेचे प्रमुख, एक नोडल अधिकारी तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी समन्वयक यांचा समावेश आहे. शिक्षण संस्था स्थानिक उद्योगांमध्ये उपलब्ध प्रकल्प शोधेल आणि त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करेल. इतर गोष्टींबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, संभाषण कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना मुलाखतीसाठी तयार करण्यासाठी इंटर्नशिप सेल काम करणार आहे. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या अनुभवांवर सर्वसमावेशक अहवाल तयार करायचा आहे.





  Print






News - Rajy




Related Photos