महत्वाच्या बातम्या

 ऐन थंडीत खुल्या बाजारातील वीज तापली : राज्याची मागणी वाढल्याने प्रतियुनिटचा दर सहा रुपयांवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात थंडीचा कडाका असल्याने विजेच्या दैनंदिन मागणीत घट होणे अपेक्षित असतानाही महावितरणकडे मात्र विजेची वाढीव मागणी नोंदली जात आहे. सध्या महावितरणकडे २२ ते २३ हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे.

त्यामुळे खुल्या बाजारातून घेतल्या जाणाऱया विजेने चांगलाच भाव खाल्ला असून प्रतियुनिटसाठी साडेपाच ते सहा रुपये मोजावे लागत आहेत. त्याचा थेट भुर्दंड वीज बिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसणार आहे.

महावितरणचे राज्यात पावणेतीन कोटी वीज ग्राहक असून त्यांच्याकडे विजेची कमाल मागणी २४ ते २५ हजार मेगावॅट, तर किमान मागणी १८ ते १६ हजार मेगावॅट एवढी नोंदली जाते. हिवाळय़ात विजेचा वापर कमी होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसते, मात्र यंदा राज्यात थंडी असतानाही विजेची मागणी मात्र वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह शेजारील गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांतही विजेची मागणी जास्त आहे. त्यामुळे दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वच वीज वितरण पंपन्यांनी आपला मोर्चा खुल्या बाजारातील विजेकडे वळवला आहे. विजेची मागणी वाढल्याने आपसूकच विजेचा दर वाढला आहे. वीज खरेदी करारानुसार वीजनिर्मिती पंपन्यांकडून महावितरणला तीन ते साडेतीन रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळत असतानाही जादा दराची वीज खरेदी करावी लागत असल्याने त्याची भरपाई भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांकडून केली जाणार आहे. मात्र मुंबईची विजेची मागणी २ हजार ७३३ मेगावॅट एवढी स्थिर आहे.

विजेची मागणी अशी पूर्ण केली -

महावितरणकडे आज राज्यभरातून २२ हजार ९५५ मेगावॅट विजेची मागणी नोंदली आहे. ती पूर्ण करण्यासाठी महावितरणने महानिर्मितीकडून ७ हजार ४३१ मेगावॅट, खासगी प्रकल्पातून ८ हजार ८९० मेगावॅट वीज घेतली आहे, तर केंद्रीय प्रकल्प आणि खुल्या बाजारातून ८ हजार २९ मेगावॅट विजेची खरेदी करत ग्राहकांची मागणी पूर्ण केली.





  Print






News - Rajy




Related Photos