कलम ३७० आणि काश्मीर प्रश्न या विषयावर श्री शिवाजी महाविद्यालयात चर्चासत्र शृंखला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / राजुरा :
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संसदेत कलम ३७० रद्द करण्याचा ठराव केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा  यांनी मांडल्यानंतर विद्यार्थ्यांना याविषयाची माहिती होऊन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी 'कलम ३७०  आणि काश्मीर प्रश्न' याविषयावर दिनांक ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र शृंखलेचे आयोजन करण्यात आले होते. 
या चर्चासत्रामध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि ३०० विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्ष सहभाग घेऊन चर्चा घडवून आणली.  खऱ्या अर्थाने  ५ ऑगस्ट ला राज्यसभेत कलम ३७० रद्द करण्यासाठी भारताचे गृहमंत्री  अमित शहा   यांनी प्रस्ताव मांडला आणि संपूर्ण देशभरात चर्चेला सुरवात झाली, 
राज्यसभेत हे कलम रद्द करण्याचा ठराव पारित झाल्यानंतर ६ ऑगस्ट ला लोकसभेत हा ठराव विक्रमी बहुमताने मंजूर झाला आणि देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, भारताला स्वातंत्र्य मिळवून ७२ वर्ष पूर्ण होत असतांनाच सर्व भारतीय जनतेच्या मनात एक शल्य होते ते म्हणजे काश्मीर ला प्राप्त असलेला विशेष दर्जा याचे, भारतीय संविधानात कलम ३७०  हे काश्मीर साठी विशेष कलम होते आणि त्यानुसार या राज्याचा कारभार, केंद्राकडून मिळणारी मदत, केंद्र सरकारला काश्मीर मध्ये न करता येणारा हस्तक्षेप, भारतीय संसदेने पारित केलेल्या कायद्याला काश्मीर मध्ये असलेली मर्यादा या सर्व बाबीवर उहापोह सुरु झाला, या सर्व बाबी सामान्यांपर्यंत पोहचाव्या तसेच विद्यार्थ्यांना यावर चर्चा करत यावी यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुद्दमवार, इतिहास विभागप्रमुख प्रा. गुरुदास बल्की यांनी "कलम ३७० आणि काश्मीर प्रश्न" या विषयावर महाविद्यालयात चर्चासत्र शृंखलेचे आयोजन केले.
यामध्ये कला शाखेच्या तीनही वर्षातील विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवून आपली मते मांडली आणि या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आणली.
या चर्चासत्रात खऱ्या अर्थाने काश्मीर राज्याचा इतिहास तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर महाराजा हरिसिंग यांनी भारतात केलेले काश्मीरचे विलीनीकरण, त्यानंतर पाकिस्तान ने काश्मीर मध्ये केलेली घुसखोरी, त्यातून झालेले युद्ध आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात भारताने हा प्रश्न नेऊन शांततेने सोडविण्याचा केलेला प्रयत्न, त्यानंतर आजतागायत पाकिस्तानशी झालेले युद्ध आणि त्यानंतर भारताचे आणि पाकिस्तान सोबत ताणलेले द्विपक्षीय संबंध तसेच काश्मीर ला दिला गेलेला ३७० व्या कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा या सर्व बाबीवर विद्यार्थ्यांनी या चर्चासत्र श्रुखलेत सजग राहून विस्तृत चर्चा केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, प्रत्येक विद्यार्थ्यांने हा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या चर्चासत्र शृंखलेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चर्चासत्र शृंखलेच्या समारोपीय कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या प्रसंगी प्रा. आत्राम, प्रा. मनुरे, प्रा. महा, प्रा. सुखारे तसेच या चर्चासत्र शृंखलेचे आयोजक डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. गुरुदास बल्की उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुदास बल्की, सिद्धार्थ चव्हाण, प्रास्ताविक डॉ. मुद्दमवार तर आभार  प्रतीक डाखरे यांनी मानले.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-12


Related Photos