मतदार नोंदणीपासून वंचित नागरिकांनी नाव नोंदणी करावी : मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग


- अशासकीय संस्थांनी मतदार जागृती कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह
- मतदार नोंदणीसाठी प्राधिकृत केल्याबाबत चुकीची प्रसिद्धी नको
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
मतदार नोंदणी कार्यक्रम ही बाब संपूर्णत: भारत निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करावा अथवा प्रत्यक्ष अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात येऊन अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी केले आहे.
अशासकीय संस्था, विश्वस्त संस्था, नागरी सेवा संस्था आदींनी स्वेच्छेने मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह आहे. मात्र, असे कार्यक्रम राबविण्यासाठी भारत निवडणूक आयोग (इसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कोणत्याही खासगी संस्थांना प्राधिकृत केलेले नसल्याने आयोगाच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची चुकीची प्रसिद्धी संबंधित संस्थांनी करता कामा नये. काही अशासकीय संस्था तसेच विश्वस्त संस्थांकडून भारत निवडणूक आयोग (इसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून तसेच इसीआय तथा आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे. 
  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1950 अनुसार मतदार नोंदणीची जबाबदारी ही पूर्णत: भारत निवडणूक आयोगाची, पर्यायाने  मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील मतदार नोंदणी अधिकारी यांची आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. या निवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार यादीमध्ये अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र
नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाची सर्व जनतेला माहिती व्हावी यासाठी मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मोहिम तसेच मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येत आहेत.
अनेक अशासकीय संस्था तसेच नागरी सेवा संस्था यांच्याकडून देखील त्यांच्या स्तरावरून मतदार जागृतीचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे दिसून येत आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र भारत निवडणूक आयोगाची अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची अधिकृत संमती अथवा मान्यता न घेता, काही अशासकीय संस्था तसेच ट्रस्ट यांच्याकडून इसीआय अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून आणि सहकार्याने असे कार्यक्रम केले
जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे. ही बाब आक्षेपार्ह आहे.
मतदार जागृतीचे कार्यक्रम कोणत्याही यंत्रणेमार्फत केले जात असले तरी मतदारांनी प्रत्यक्ष मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार नोंदणीसाठीचे अधिकृत संकेत स्थळ www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच तहसिलदार कार्यालय किंवा आपल्या विभागाकरिता नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातूनही मतदार नोंदणीचा अर्ज सादर करता येईल. मतदार नोंदणी न झालेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही सिंग यांनी केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-11


Related Photos