सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
राष्ट्रीय कार्यकारिणीत दिवसभर काथ्याकुट करूनही काँग्रेसला नवा अध्यक्ष सापडू शकलेला नाही. अखेर अध्यक्षपदाची प्रक्रिया लांबवणीवर टाकत माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज राष्ट्रीय कार्यकारिची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. आज दोन सत्रांमध्ये ही बैठक झाली. सकाळी बैठकीच्या सुरुवातीला सोनिया गांधी व राहुल गांधी उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगत सोनिया व राहुल बैठकीतून निघून गेले. त्यानंतर नेत्यांचे क्षेत्रवार गट तयार करून चर्चा करण्यात आली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. रात्री ८ वाजता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा बैठक झाली व त्यात पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोनियांकडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
काँग्रेसचे माध्यम प्रमुख रणदीप सुरजेवाला आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राहुल गांधी यांनी सक्षमपणे पक्षाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवावं, असा आग्रह काँग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार व अन्य नेत्यांनी कार्यकारिणीकडे धरला होता. त्यानुसार कार्यकारिणीने राहुल यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं, असा ठराव केला. मात्र राहुल यांनी सर्वांच्या आग्रहाचा सन्मान राखत विनम्रपणे अध्यक्षपद नाकारलं. त्यानंतर पक्षाचा नवा अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधी यांनी पक्षाचं हंगामी अध्यक्षपद सांभाळावं, असा प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव सोनिया यांनी मान्य केल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. 
  Print


News - World | Posted : 2019-08-11


Related Photos