युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री


वृत्तसंस्था /  कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरमधील पुरस्थिती अतिशय गंभीर असून पंजाब, गोवा, गुजरातमधून मागवण्यात आलेल्या अतिरिक्त पथकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करतानाच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच अधिकारी आणि पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं.
कोल्हापुरात १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली असून ऊसालाही धोका निर्माण झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 
 कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी पंजाब, गोवा आणि गुजरातमधून एनडीआरएफची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. सांगलीत परिस्थिती अत्यंत गंभीर असून खराब हवामानामुळे सांगली दौरा रद्द करावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 
पूर परिस्थितीमुळे २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. तो कसा चालू करता येईल यावरही विचार सुरू आहे. तसेच पाणी ओसरल्यानंतर दोन तासांत वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी अधिक कुमक पुरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास हवाई मार्गाने औषधे पुरवली जाणार असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. ज्या ठिकाणी पूरस्थिती अधिक आहे, तिथे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सर्वात आधी करण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत महामार्ग खुला झाल्यास पेट्रोल-डिझेल पोहोचवण्यात येईल. अन्यथा दुसरा पर्याय विचारात घेतला जाईल, या संदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांशीही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात १९० ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. उपसा केंद्र पाण्यात गेल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने हा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 बोट उलटून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या  कुटुंबीयांना पाच लाख 

सांगलीत बोट उलटून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि कोल्हापुरात पुरामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा संसार उद्धवस्त झाला आहे. या सर्व लोकांना सरकारकडून आवश्यक मदत दिली जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.   Print


News - Rajy | Posted : 2019-08-08


Related Photos