पर्यटकांनी सहकार्य करावे : मुग्दाई देवस्थान समितीचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
चिमूर तालुक्यातील डोमा येथील मुक्ताई धबधबा पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचं केंद्र आहे. या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. परंतु आदिवासींचे प्रेरणास्थळ तसेच पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी विनयशीलता व नैतिकतेने ट्रस्टच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे स्वयंसेवक म्हणून युवांनी सेवा देण्याचे आवाहन प्रेरणादायी विरांगणा मुग्दाई आदिवासी सेवा चारीटेबल ट्रस्ट व माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने केले आहे.
नागभीड -चिमूर  तालुक्यात  पसरलेल्या सात बहिणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोमा येथे मुक्ताई धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. येथील निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेतात. परंतु याच ठिकाणी आदिवासींचे श्रद्धास्थान विरांगणा मुग्दाई देवस्थान आहे. या प्रेरणा स्थळावर डोमावासीय आणि लाखो आदिवासींची श्रद्धा आहे. तसेच हा भाग जंगलात असल्याने वन्यप्राणी व पक्षी यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने तसेच बेजबाबदारपणे वागण्याने या प्रेरणास्थळाची विनाकारण बदनामी होत असल्याने येथील आदिवासींच्या व डोमा वासियांच्या भावना दुखावल्या जात आहे. तसेच पर्यटकांच्या माध्यमातून होत असलेल्या प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त व्यक्त करत आहे. शिवाय तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्यामुळे सज्जन पर्यटकांची मने दुखावली जात आहे, याची नोंद संपूर्ण पर्यटकांनी घेणे गरजेची आहे.

पर्यटकांना सूचना

 मुग्दाई देवस्थान समिती व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने उन्माद माजवणाऱ्या पर्यटकांच्या नियंत्रणासाठी पावले उचलली असून मुक्ताई ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलीस येथे पहारा देत आहे. मुग्दाई ट्रस्टच्यावतीने पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सूचना फलक लावले आहे. पर्यटकांना निसर्ग व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत कालावधी ठरवलेला आहे. अश्लील व असभ्य वर्तणूक तसेच दारू  पिऊन आढळल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पर्यटकांनी धबधब्याजवळ स्वयंपाक करू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये. पर्यावरणाचे रक्षण करा. प्लॅस्टिक व इतर वापराच्या वस्तू कचराकुंडीत टाकून परिसर स्वच्छ ठेवा. सुव्यवस्थेसाठी स्वयंसेवकाला सहकार्य करा. कोणतीही तक्रार असल्यास ट्रस्ट सोबत संपर्क साधा. येथील व्यवस्था सुधारण्यासाठी उचित सूचना स्वीकारला जाईल, अशा सूचना मुग्दाई ट्रस्टचे अध्यक्ष रामराव नन्नावरे यांनी दिल्या. 

युवांना आवाहन

सोबतच  येत्या १५  ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे पर्यटक व श्रद्धाळू लाखोच्या संख्येत राहणार आहे. या प्रचंड गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचीही दमछाक होत असते. म्हणून त्यादिवशी स्वयंसेवक म्हणून दरवर्षीप्रमाणे सेवा देण्याकरिता ४००  तरुणांची गरज असून त्याकरिता इच्छुक युवांनी विद्यार्थी संघटनेशी संपर्क  साधावा, असे आवाहन आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनचे विदर्भ अध्यक्ष सुहानंद ढोक यांनी केले आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-08


Related Photos