कलम ३७० वरून खा. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्यात रंगली जुगलबंदी!


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम  ‘ ३७०’ रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेचा सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम ३७० संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले. मात्र त्यांच्या वक्तव्यावर शाह यांनी मजेशीर उत्तर दिल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी काही काळ त्यांच्यात जुगलबंदी रंगली. 
कलम ३७० बद्दल बोलण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी काश्मीरमधील नेत्यांशिवाय ही चर्चा अपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला  यांच्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या,  ‘मी सभागृहामध्ये ४६२ क्रमांकाच्या आसनावर बसते तर फारूक अब्दुल्ला ४६१ क्रमांकाच्या आसनावर बसतात. ते जम्मू आणि काश्मीरमधून निवडूण आले आहेत. आज संसदेमध्ये त्यांचा आवाज ऐकू येत नाहीय. इतिहासात डोकावून पाहिले तर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीशिवाय झालेली ही चर्चा कायम अपूर्ण म्हणूनच पाहिली जाईल'. 
यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी  शाह  यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरणसाठी विनंती केली. सुळे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अब्दुल्ला हे स्वत:च्या इच्छेने घरी बसले असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. ‘फारुख अब्दुल्ला यांना ना ताब्यात घेण्यात आलेय ना त्यांना अटक करण्यात आलीय. ते स्वत:च्या मर्जीने स्वत:च्या घरी बसले आहेत,’ असे स्पष्टीकरण शाह यांनी दिले. शाह यांच्या या मजेदार स्पष्टीकरणानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
शाह यांच्या उत्तरावर परत सुळे यांनी हसतच अब्दुल्ला का अनुपस्थित आहेत याबद्दलची माहिती दिली. ‘अब्दुल्ला यांची तब्बेत ठिक नसल्याने ते सभागृहात आलेले नाहीत,’ असं सुळे यांनी सांगितले. यावर शाह यांनी लगेच, ‘त्यांची तब्बेत मी नाही डॉक्टर ठीक करु शकतात’ असा टोला लगावला. यावर सुळे यांनी सावरुन घेण्याचा प्रयत्न करत ‘नाही मी त्याबद्दल बोलत मी माझ्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांना ताब्यात घेण्याबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही,’ असं सांगितलं.   दरम्यान, राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयक १२५ विरुद्ध ६१ मतांनी मंजूर करण्यात आले आहे. आज या विभाजनावर लोकसभेमध्ये चर्चा सुरु आहे.  Print


News - World | Posted : 2019-08-06


Related Photos