बिनागुंडा परिसरातील नागरीक करणार आता बोटीने प्रवास


- पावसाळ्यातील गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने दिल्या दोन बोटी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड तालुक्यात अनेक नदी, नाले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरीकांना दळणवळणाच्या सोयींपासून दूर रहावे लागते. अनेक दिवस पावसामुळे संपर्क खंडीत राहतो. यामुळे रूग्णांचे हाल होतात. नागरीकांची दैनंदिन कामे खोळंबतात, जगाशी संपर्क नसतो. ही बाब लक्षात घेत तहसीलदार कैलास अंडील यांच्या पाठपुराव्यामुळे बिनागुंडा परिसरातील नागरीकांच्या आवागमनासाठी दोन बोट उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आता बिनागुंडा परिसरातील नागरीक पावसाळ्यात बोटीने प्रवास करणार आहेत.
तालुक्यातील अतिदुर्गम, दाट जंगलाने वेढलेला भाग म्हणजे बिनागुंडा परिसर. भामरागड तालुका मुख्यालयापासून बिनागुंडा परिसर ३६ किमी अंतरावर आहे. पावसाळ्याचे ३ ते ४ महिने लाहेरी नंतर दळणवळणाची साधने जावू शकत नाहीत.  यामुळे लाहेरीपासून जवळपास ४ ते ५ किमी अंतर पायीच पार करावे लागते. मध्येच गुंडेनूर गावाजवळ नाला आहे. या नाल्यावर बांबूपासून पुल तयार करण्यात आले आहे. या पुलावरूनसुध्दा पाण्याचा प्रवाह कमी असताना प्रवास करू शकतो. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यास पुलाचा पण उपयोग होत नाही. यामुळे जाणे - येणे कठीण होते. या भागातील नागरीकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत नाहीत, आरोग्य सेवा मिळत नाही. रूग्णांना इतरत्र नेणे सुध्दा कठीण होते. यामुळे ही बाब हेरून तहसीलदार कैलास अंडील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने निधी मंजूर करून बिनागुंडा परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या. बोट भामरागड तहसील कार्यालयात दाखल होता. दोन्ही बोट लाहेरी येथे रवाना करण्यात आल्या. आता पावसाळ्याच्या दिवसात नागरीकांना तालुका मुख्यालयी येण्यास सोयीचे होणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-06


Related Photos