महत्वाच्या बातम्या

 दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी, बटरचे दर यावर अवलंबून असतात. दूध उत्पादकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार आहे.

- यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता, याकडे मंत्री विखे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

अशा असतील अटी व शर्थी : 
- योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान २९ रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.
- डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.





  Print






News - Nagpur




Related Photos