चिखल तुडवीत शाळा गाठतात चेतापल्ली येथील विद्यार्थी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा : 
भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या १५ ऑगस्ट रोजी ७२ वर्षे पूर्ण होतील. एवढी वर्षे होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांपर्यंत अनेक सोयी - सुविधा पोहोचल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रस्त्याअभावी लहान - लहान विद्यार्थ्यांनासुद्धा चिखल तुडवीत शाळा गाठावे लागत असल्याचे चित्र सिरोंचा तालुक्यातील चेतापल्ली येथे निदर्शनास आले आहे. 
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अंकिसा केंद्रा अंतर्गत येत असलेल्या चेतापल्ली येथील जिल्हा परिषद शाळेच्या  विद्यार्थ्यांना दैनंदिन संघर्ष  करत चिखलातून मार्ग काढत शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. शासन शाळा डिजिटल तर करत आहे,  पण त्या डिजिटल शाळेत जाण्यासाठी मार्ग  चिखलमय आहे.  पावसाळ्यात  चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षण तरी घ्यावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  याप्रमाने अंकिसा केंद्रातील तोर्रेगुड़म, जंगलपल्ली या गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच प्रकारे शाळा गाठावी लागत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-04


Related Photos