महाजानदेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर रुचित वांढरे यांच्यासह अन्य एकास पोलिसांनी ठेवले नजरकैदेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजानदेश यात्रा गडचिरोलीत येत आहे.   या पार्श्वभूमीवर  गडचिरोली पोलिसांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्यासह  राहुल भांडेकर  याला ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवल्याने खळबळ निर्माण झाली आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री ७ वाजता गडचिरोली येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत कुणीही गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून धरपकड मोहीम राबवली. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्या घरी पोलिस पोहचले. त्यांनी वांढरे यांना वाहनात बसवून पोलिस ठाण्यात आणले. तेव्हापासून ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. यावेळी ‘७ ऑगस्टला’ हैद्राबाद येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन असून, मी त्या अधिवेशनाला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत कुठलीही घोषणाबाजी करण्याचे आपले प्रयोजन नाही’, असे आपण पोलिसांना सांगितले.  त्यावेळी पोलिसांनी तिकिट मागितले असता मी राहुल भांडेकर यास तिकिट घेऊन बोलावले. परंतु पोलिसांनी त्यालाही पोलिस ठाण्यात बसवून नजरकैदेत ठेवले, असे रुचित वांढरे यांनी सांगितले.  कुठलीही सूचना किंवा नोटीस न देता पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले आहे. सरकारचा ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असेही वांढरे यांनी म्हटले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-04


Related Photos