बेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण


-  शिक्षकांना व विद्यार्थ्यांना करावी लागते तारेवरची कसरत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
  तालुका  मुख्यालयापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथील जिल्हा परिषद शाळेची व्यवस्था पूर्णपणे जर्जर झालेली असून येथे वर्ग एक ते  सात पर्यंतचे १२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  या शाळेतील प्रत्येक खोली गळत  असून पावसाळ्यात शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिवसभर कसरत करावी लागत आहे. 
प्रत्येक वर्गखोली मध्ये पाणी साचुन  राहत असते.  तसेच सिमेंटचे पापुद्रे आपोआप खाली पडत असतात,  जे विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी सुद्धा धोकादायक आहे. कित्येकदा शाळेच्या भिंती मध्ये विजेचा करंट सुद्धा राहत असल्याची माहिती मिळाली असून शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याचीसुद्धा टंचाई आहे.  या शाळेत एकाच वर्ग खोली मध्ये ३ - ३ वर्ग भरविले जात आहेत. या शाळेत शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक आपला जीव मुठीत घेऊन आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवित आहेत.  असेच हाल झगडवाही, टेकाबेदड, जामनार मध्ये  सुद्धा असून येथील शाळेची सुद्धा गळती सुरू आहे. विद्यार्थी खूप काटकसरीने आपले शिक्षण घेत आहेत आणि बेतकाठी, झगडवाही, टेकाबेदड, आणि जामणारा हे बेतकाठी केंद्र अंतर्गत येतात. जिल्हा परिषद शाळा बेतकाठी येथे जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, भ्रष्टाचार निवारण समितीचे तालुका उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, सदस्य भुमेश शेंडे, सरपंच सुरेश काटेंगे, राम नाईक यांनी भेट देऊन बेतकाठी केंद्राचे केंद्रप्रमुख नारदेलवार यांच्याशी चर्चा केली असता आम्ही गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे संबंधित शाळेच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा केलेला आहे असे सांगण्यात आले.  नंतर अनिल केरामी यांनी गट शिक्षणाधिकारी आत्राम यांच्याशी चर्चा करून तात्काळ बंदोबस्त करावे व शाळा दुरुस्तीकरिता सीईओ व जिल्हाधिकारी  यांच्याशी चर्चा करून हा गंभीर प्रश्‍न मार्गी लावण्यामध्ये मदत करू असे आश्वासन केरामी यांनी दिले.   शाळेची लवकरात लवकर गांभीर्याने दखल घेऊन डागडुजी करावी व नवीन इमारतीचे सुद्धा बांधकाम करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भ्रष्टाचार निवारण समिती व बेतकाठी येथील गावकऱ्यांनी दिला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos