महत्वाच्या बातम्या

 आजपासून पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवास सुरुवात 


- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
- ग्राहकांनो, संधीचा लाभ घ्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत धान्य महोत्सव १९ ते २३ डिसेंबर कालवधीत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याचे उदघाटन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री धनंजय मुंडे राहणार आहेत.

खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप  कुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, सुनील केदार, समीर मेघे, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वनामतीच्या संचालक डॉ. मिताली सेठी, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, दिलीप झेंडे, सुभाष नागरे, विकास पाटील, दशरथ तांबाळे, रविंद्र भोसले, कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सव पाच दिवसाचा असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. १९ डिसेंबरला महोत्सवाचे उद्घाटन व उपस्थितांचे मार्गदर्शन, २० नोव्हेंबरला खरेदीदार व विक्रेते संमेलन, २१  डिसेंबरला शेतकरी उत्पादक गट व कंपनी यांची क्षमता बांधणी व व्यवस्थापन यावर परिसंवाद, २२ डिसेंबरला रेशीम उद्योग कार्यशाळा तर २३ डिसेंबरला शेतकरी सन्मान समारंभ व समारोप होणार आहे.

या महोत्सवामध्ये एकूण २०० दालनांचा समावेश असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून उत्पादित झालेल्या कृषी माल, धान्य, फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेले पदार्थ, सेंद्रिय कृषी माल, दुग्धजन्य पदार्थ आदी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

याचबरोबर विविध कृषी निविष्टांचे दालनांचे माध्यमातून शेतक-यांना कृषी निविष्ठा, अवजारे, कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती तथा खरेदी विक्री करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या दालनात विविध प्रात्यक्षिके, कृषी विद्यापीठे, कृषी व कृषी संलग्न विभाग, विविध कृषी महामंडळे, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मत्स्य विकास विभाग, रेशीम विभाग, विविध कृषी महामंडळे, खादी ग्रामोद्योग आदीचे स्टॉलचा समावेश करण्यात आलेला आहे.

जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा व मोठया प्रमाणात खरेदी करुन सहकार्य करावे, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos