महाजनादेश यात्रा जनतेला मूर्ख बनविण्यासाठी : विजय वडेट्टीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  महाराष्ट्रात सध्या यात्रांचा सुळसुळाट आहे. सत्ताधाऱ्यांनी यात्रांचा शुभारंभ केला आहे. पण यात्रा काढून दारोदारी जाण्याची वेळ त्यांच्यावर का आली? पाच वर्षे विकासकामे केली असती तर घरी बसून मते मिळाली असती, यात्रा काढण्याची वेळच आली नसती. महाजनादेश यात्रा जनतेला मूर्ख बनविण्यासाठी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत बोलताना केली. 
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारचा आत्मविश्वास कमी झाला आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या तोंडाने ते मते मागणार आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाने साखर कारखाने धोक्यात आले आहेत. त्यातूनच ते आमदार पळवित आहेत. स्वखुशीने नव्हे तर त्याला वेगवेगळी कारणे आहेत. दबावात व सत्तेचा गैरवापर करून त्यांना पक्षात घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 
३० लाख शेतकरी पात्र असताना आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. पीक कर्जासंदर्भात बँका सरकारला जुमानत नाही, परिणामी त्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगारी वाढली आहे. ऑटोमोबाईल उद्योग देशात बंद पडत आहे. त्यामुळे अडीच लाख लोकांचा रोजगार राज्यात धोक्यात आला आहे. अनेकांनी नोकरकपात सुरू केली आहे. या सरकारने बेरोजगारांची फौज निर्माण करण्याचे काम केले आहे. २९ ते ३४ टक्क्यांनी खताचे भाव वाढले आहे. आरोग्य विभागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. परिणामी कुपोषणाने बालके मरत असल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवसेना व भाजप सोडून इतर सर्व पक्ष १४८ अशासकीय संघटनांसह येत्या ९ ऑगस्ट या क्रांती दिनी ईव्हीएम मुक्तीसाठी मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-02


Related Photos