मराठी शाळांची गुणवत्ता वाढ आवश्यक : आर. देशपांडे


- शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत मुख्याध्यापकांची सभा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली :
दिवसेंदिवस प्रत्येक जिल्ह्यातील अनेक मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे मराठी शाळांची गुणवत्ता वाढविणे आवश्यक असल्याचे आवाहन नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आर. देशपांडे यांनी केले. 
स्थानिक कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी विभागीय मंडळाच्या सहसचिव एम. जी. सावरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राघवेंद्र मुनघाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, नागपूर बोर्डाचे शाखाधिकारी कन्नमवार, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय नार्लावार आदी उपस्थित होते. 
यावेळी आर. देशपांडे यांनी जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या यावर्षी लागलेल्या निकालात जिल्हा माघारलेला असल्याबद्दल चिंतन करण्याची आवश्यकता विषद केली. प्रत्येक शाळेकडून अचूक व सुलभ काम व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करून शाळा टिकून राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध असाव्या, यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे, निकाल कमी लागण्याची कारणे शोधन त्यावर उपाययोजना करण्याबाबतही मार्गदर्शन करून कॉपी करणारे विद्यार्थी जिवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही, असे सांगितले. दहावी व बारावीसाठी दरवर्षी बोर्डाकडून वर्धित मान्यता घ्यावी लागते. ती आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार पाच-दहा वर्षे किंवा कायमस्वरुपी मान्यता दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
यावेळी आपल्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी गडचिरोली जिल्ह्यात सकारात्मक वातावरण असून यापुढे पाचवीपासून होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्याची घोषणा केली. कमी निकालाबाबत चिंतन परिषद घेतल्याची माहिती देऊन निकाल उंचाविण्यासाठी मुख्याध्यापक व विषय शिक्षकांची बैठक घेण्याचा मनोदय व्यक्त केला. विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करून शिक्षकांना योग्य अध्यापनासाठी मार्गदर्शन करणे व यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी सहसचिव एम. जी. सावरकर यांनी मुख्याध्यापकांना येणाऱ्या सर्व अडचणीची माहिती देऊन ऑनलाइन पद्धतीने होणारे कार्य समजून सांगितले. दिव्यांग विद्यार्थी यांना मिळणाऱ्या सवलती व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, एनसीसी, स्कॉऊट गाईडमधील राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हास्तरावर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणारे अधिकचे गुण यासाठी प्रस्ताव क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना निकालापासून २० दिवसांत आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त केली जाऊ शकते. याचेही मार्गदर्शन केले. यावेळी शाखाधिकारी कन्नमवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राघवेंद्र मुनघाटे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश उचे यांनी केले. (फोटो)

'युवा जागर - महाराष्ट्रावर बोलू काही' वक्तृत्व स्पर्धा

 क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे राज्यामध्ये युवा संसद कार्यक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य, जिल्हा, गट व महाविद्यालयस्तरावर युवा 'जागर-महाराष्ट्रावर बोलू काही' या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ ऑगस्टला प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असून यापुढील कार्यक्रम लवकरच घोषित केला जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-01


Related Photos