विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली वीज बिलांची होळी, धरणे आंदोलन


- मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विदर्भातील सर्व जनतेचे विजेचे बिल निम्मे झाले पाहिजेत, कृषी पंपांचे बिल माफ झाले पाहिजे, ग्रामीण भागातील लोडशेडींग संपले पाहिजे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विज वितरणच्या कार्यालयासमोर विज बिलाची होळी करण्यात आली. तसेच धरणे आंदोलन करण्यात आले. विज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनात म्हटले आहे की, कोळसा आधारीत विज औष्णीक केंद्र विदर्भात आहेत. त्यासाठी विदर्भाची जमीन गेली, विदर्भातील पाणी गेले, विदर्भाचा कोळसा लागला आणि प्रदुषणही विदर्भात होत आहे. यामुळे कॅन्सर, दमा, अस्थमा आदी दुर्धर आजारही विदर्भातील जनतेलाच होत आहेत. असे असतानाही विदर्भालाच विजेचा प्रचंड दर आकारला जात आहे. प्रचंड दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सर्वात महाग विज महाराष्ट्रात  आहे. मिटर भाडे, विज वहन कर, भार, अधिभार यामुळे विज ग्राहक लुटल्या जात आहे. यामुळे आता विदर्भातील जनता सहन करणार नाही, यासाठी तिव्र आंदोलन उभारू असा इशारा देत आज १  ऑगस्ट  रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विज वितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. तसेच धरणे आंदोलन केले. 
यानंतर ९ ऑगस्ट  रोजी नागपूर येथील संविधान चौकापासून विजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानापर्यंत विज व विदर्भ मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करू, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, जिल्हा सचिव डाॅ. देविदास मडावी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, प्रभाकरराव बारापात्रे, सुलोचना मडावी, डी.डी. सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रय बर्लावार, दत्तात्रय पाचभाई, पी.जी. टोपरे, तुळसाबाई खोब्रागडे, गोवर्धन चव्हाण, चंद्रशेखर जक्कनवार, रमेश भुरसे, एजाज शेख, बाळु मडावी, विश्वनाथ भिवापुरे आदी सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-01


Related Photos