काँग्रेसच्या मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये ईच्छुकांचाच अधिक भरणा, निवड समितीवर माजी खासदार पुगलीया गटाचा आक्षेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
प्रदेश काँग्रेस कमेटीने  नियुक्ती केलेल्या समितीद्वारे काल ३१ जुलै रोजी  चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा - भद्रावती या सहा  विधानसभा क्षेत्रासाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  मात्र मुलाखत घेणाऱ्या समितीमध्ये ईच्छुकांचाच अधिक भरणा असल्याने ते मुलाखत देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देतील का?  असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसच्या या निवड समितीवर माजी खासदार नरेश पुगलीया यांच्या  गटाने आक्षेप घेतला. 
  राजीव गांधी कामगार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत इंटकचे चंद्रशेखर पोडे यांनी हा आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे जे नव्याने कार्याध्यक्ष  नियुक्त करण्यात आले त्यांच्यावर  जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा निवड समितीमध्ये  विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, चंद्रपूर महानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश  देवतळे, डॉ.आसावरी देवतळे, माजी आमदार देवराव भांडेकर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश मेंढे, सुनिता लोढीया, डॉ.सतिश  वारजूकर आदींसह २७ जणांचा समावेश आहे. यातील बहुतेक जण आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास ईच्छूक आहेत मग हेच  ईच्छूक जर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मुलाखती घेत असतील तर खरोखरच निष्ठावंत कार्यकर्त्याला  उमेदवारी मिळेल का?  यावर चंद्रशेखर पोडे यांनी  प्रश्नचिन्ह उपसिथत केला आहे.
 येत्या ऑक्टोंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे जून्याच निवड कमिट्या स्थापित केल्या आहेत. या समितीत ९० टक्के जे विधान सभेकरीता इच्छूक उमेदवार आहेत त्यांचाच भरणा आहे. प्रदेश काँग्रेस तर्फे जे जुनेच निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत ते सुद्धा इच्छूक उमेदवार आहेत. मागच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी ज्या समित्या मागील प्रांताध्यक्षांनी नियुक्त केल्या होत्या व  ज्यांनी चंद्रपूर वगळता पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची एकही लोकसभा सीट निवडून आणली नसून पक्षाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच लोकांना  परत जिल्ह्यात -जिल्ह्यामध्ये पाठविण्याचे प्रयोजन चुकीचे आहे कारण त्यांनी स्वत:करीताच उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, असा आरोप करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष आणि नेते राहूल गांधी यांनी याबाबत पूर्ण दक्षता घेतली असून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदी व पाच कार्याध्यक्ष यांची नव्याने नियुक्ती  केली आहे. परंतु ही जबाबदारी वेगवेगळ्या विभागात कार्याध्यक्षांना दिली असती तर योग्य उमेदवारांना न्याय मिळाला असता परंतु तसे न  करता जुन्याच समितीच्या लोकांना ही जबाबदारी दिली असल्यामुळे  नि:पक्षपणे योग्य उमेदवाराची निवड होईल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या विचारसरणीला  धरुन अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरीता जे झटत आहेत त्यांना बाजूला सारुन आर्थिक दृष्टिकोनातून गब्बर  असलेले व अन्य मार्गाने माया गोळा  करणारे व इतर पक्षातून आलेले अशाच लोकांना विधान सभेची उमेदवारी मिळत असल्यास व निष्ठावंतांची उपेक्षा होत असल्यास  लोकसभेत जसा पक्षाचा दारूण पराभव झाला तसाच पराभव विधानसभेत होईल, असे पोडे म्हणाले. 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-01


Related Photos