बेपत्ता असलेल्या युवतीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले विहिरीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा
: तालुक्यातील शेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचे प्रेत एका शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.
मयुरी सोमेश्वर वैद्य (२२)  असे युवतीचे नाव आहे. मयुरी ही शनिवारी महाविद्यालयात परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी वरोरा येथे जात असल्याचे घरी सांगितले. यानंतर ती बेपत्ता झाली होती. याबाबत घरच्यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहिम राबविली. त्यानंतर आज शेगाव - वाघोली रस्त्यालगत एका शेतातील विहिरीतून दुर्गंध येत असल्याने शेतकऱ्याने  विहिरीत बघितले असता युवतीचे प्रेत आढळून आले. याबाबत शेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. युवतीच्या कुटुंबीयांना बोलावून ओळख पटविण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

प्रेमसंबंधातून आत्महत्या?

सदर युवतीचे परिसरातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते, अशी चर्चा आहे. मृतक युवतीने युवकाला विवाहाची गळ घातली होती. मात्र युवकाने काही अवधी मागितला होता. दोघांच्याही घरच्यांनी समझोता करून विवाह करून देण्याचे मान्य केले होते. मात्र युवती विवाहासाठी घाई करीत होती. प्रियकरासोबत विवाह होत नसल्यामुळे युवतीने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा शेगाव परिसरात आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-31


Related Photos