गुंतवणूकदारांना १० कोटींनी गंडविणाऱ्या दोन आरोपींचा गडचिरोली पोलिसांकडून शोध , अटक वारंट जारी


- आरोपी आढळून आल्यास कळविण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सुविधा फार्मिंग अँड  अलाईड कंपनी भोपाल च्या नावे गडचिरोलीत शाखा सुरू करून अभिकर्त्यांमार्फत मोठ्या प्रमाणात ठेवीदारांकडून रक्कम गोळा केल्यानंकर पोबारा केलेल्या दोन आरोपींचा गडचिरोली पोलिसांकडून शोध सुरू आहे. सबंधित आरोपी आढळल्यास नागरीकांनी पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विनोदकुमार जमनाप्रसाद शंखवार रा. रायपुर ह.मु. देहरादून (उत्तराखंड) आणि राजेंद्रकरण शंकरलाल राजपुत रा. रायपुर ह.मु. देहरादून (उत्तराखंड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना गडचिरोली येथील बट्टूवार काॅम्प्लेक्समध्ये खोली भाड्याने घेवून सुविधा फारमिंग अँड  अलाईड कंपनीची शाखा सुरू केली. या कंपनीने अभिकर्त्यांमार्फत ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कमा गोळा केल्या. ठेवीदारांना कमी कालावधीत जास्त कमीशनचे आमिष दाखवून ठेवी गोळा करण्याचे काम करण्यात आले. मात्र ठेवीदारांचा फायदा होईल, अशी कोणतीही व्यवस्था न करता नियोजनपूर्वक कट रचून, सेबी कडून मनाई असतानाही मुदतपूर्व शाखा बंद करून आरोपी पसार झाले.  याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द कलम ४२० , ४०६ , ४०९, १२०  ब ३४  भादंवि सहकलम ३६, ७४, ७५, ४४७  द कंपनी ॲक्ट १९५६  सुधारणा सन २०१३   अन्वये २० जुलै २०१७  रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुंतवणूकदारांची सुमारे १०  कोटी रूपयांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरूध्द उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटक वाॅरंट काढला आहे. यामुळे सबंधित आरोपी आढळून आल्या पोलिसांना कळवावे, तपासी अधिकारी 9823397255, पोलिस नियंत्रण कक्ष 07132 - 222100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-31


Related Photos