वैनगंगा नदीमधील इकोर्निया निमूर्लनासाठी २ कोटीची तरतूद : पालकमंत्री डॉ. परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
वैनगंगा नदीमध्ये असलेल्या इकोर्निया वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता भाडे तत्वावर यंत्रसामुग्री लावून नदी स्वच्छ करण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान मध्ये २ कोटी रुपयाची तरतूद करावी व इकोर्निया निमूर्लनाची कार्यवाही त्वरित सुरु करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या. जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
 खासदार सुनिल मेंढे, आमदार चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सन २०१९ - २० करीता ९  कोटी ५३ लाख ६८ हजाराचा आराखडा सादर करण्यात आला.
सदर निधीतून वैनगंगा नदीतील इकॉर्निया वनस्पतीचे समूळ उच्चटन करण्याकरिता भाडे तत्वावर मशीन लावून नदी स्वच्छ करणे याकरिता रु  २ कोटी, आरोग्य विभागात नवीन यंत्र, उपकरणे व औषधी खरेदी करीता रु २५०  लक्ष, कुपोषण निर्मूलन, महिला आरोग्य अंतर्गत हिमोग्लोबिन, रक्तक्षय निर्मूलन, बालअत्याचार, बालविवाह रोखण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करीता जनजागृती महिला व बालकल्याण विभाग करीता रु १०० लक्ष तसेच वरिष्ठ व विकलांग व्यक्तीचे कल्याण करिता रु. ५०  लक्ष ठेवण्यात आले.
जिल्ह्यातील पशुसंवर्धान रुग्णालय दुरुस्ती, दूध उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी लसीकरण बाबत रु  १५० लक्ष, स्वच्छ व शाश्व्त विद्युत पुरवठा करण्याकरिता जि. पं. कार्यालय व इतर शासकीय कार्यालय मध्ये सौर ऊर्जा पॅनल स्थापित करणे तसेच भूजल मध्ये वाढ करण्याकरिता रु. १५५ लक्ष तर अवैध गौणखनिज उत्खनन थांबविण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करुन व अचूकपणे संबंधित माफियांवर कार्यवाही करण्याकरिता रु. ५०  लक्ष राखीव ठेवण्यात आले.
 सादरीकरण व्दारे केलेल्या नियोजनावर पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त करुन वैनगंगा नदीतील इकॉर्निया वनस्पती काढण्याबाबत केलेल्या प्रकल्पावर त्वरित कार्यवाही व्हावी व उक्त सर्व प्रकल्प योग्यपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळेल याची दक्षता घेण्याबाबत सुचना केल्या.  Print


News - Bhandara | Posted : 2019-07-31


Related Photos