जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस, भामरागड सह शेकडो गावांचा संपर्क तुटला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
मागील चार दिवसांपासून  जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  भामरागडसह शेकडो गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.
 शुक्रवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. चार दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गेल्या दोन दिवसात धान रोवणीच्या कामांना गती आली आहे. तसेच नदी, नाले ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.  जिल्ह्यातील नदी व नाले जंगलातून वाहतात. जंगलातील पूर्ण पाणी नदी, नाल्यांमध्ये येते. काही नदी व नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून काही ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.  आज मंगळवारी  पावसाचा जोर सुरूच आहे . त्यामुळे  नदी, नाले ओसंडून वाहत  आहे. चौडमपल्ली  नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. सोमवारी या नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.
 कमलापूर-दामरंचा मार्गावर सोमवारी कमलापूर पासून तीन किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागले.
गडचिरोली जिल्ह्यासह सिरोंचा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सततच्या पावसामुळे बालमुत्यमपल्लीजवळील येर्रावागू नाला ओसंडून वाहत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पलिकडेच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
भामरागड तालुक्यातील दुरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. भामरागड तालुका तिन्ही बाजुने नद्यांनी वेढला आहे. पूर परिस्थितीत या तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-30


Related Photos