महत्वाच्या बातम्या

  महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसू लागतील असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

विधान भवनात आयोजित राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात संसदीय लोकशाही व महिला धोरण या विषयावर अभ्यास वर्गासाठी सहभागी झालेल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधानमंडळ सचिव विलास आठवले, दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी आयएएस, आयपीएस, न्यायाधीश यासह क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या समाज माध्यमांच्या क्षेत्रातही त्या उत्कृष्टपणे काम करीत आहेत. या विविध क्षेत्रातील सहभागामुळे समाजात महिलांबद्दल अधिक आदर निर्माण होत आहे. महाराष्ट्र राज्य हे महिलांना संधी देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामुळे राज्यातील महिलांनी शिक्षण,राजकारण, क्रीडा प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी, महिला प्रश्नांचा अजेंडा अधिक समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, १९९० साली तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्यासोबत महिला आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग तयार करण्यात आला. घटना दुरुस्ती नंतर  स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण लागू झाले. मात्र हे आरक्षण लोकसभा राज्यसभा निवडणुकीत लागू नव्हते. संसदेच्या २०२३ च्या पावसाळी अधिवेशनाची महिला सक्षक्तीकरणाच्यादृष्टीने ऐतिहासिक पर्व म्हणून नोंद झाली आहे. नारी शक्ती वंदन अभियान या नावाने सादर केलेल्या १२८ व्या घटना दुरूस्ती विधेयकावर संमतीची मोहोर उमटल्याने यापुढे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये किमान ३३ टक्के महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घेतलेला पुढाकार निश्चितच आश्वासक ठरला असल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

या संसदीय अभ्यास वर्गातील अनमोल मार्गदर्शनामुळे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व निश्चितच विस्तारेल. तसेच महिला सबलीकरण आणि महिलांच्या राजकीय सहभागाबाबत त्यांचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आश्वासक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी शंतनू अहिर यांनी आभार प्रदर्शन केले.





  Print






News - Nagpur




Related Photos