महत्वाच्या बातम्या

 समित्यांनी योग्य समन्वयातून स्पर्धेचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी विनय गौडा


- गठीत समित्यांकडून स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर : तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा उत्कृष्टपणे पार पाडाव्यात यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून समित्यांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून स्पर्धेचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

नियोजन भवन सभागृह येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी आधी उपस्थित होते.

शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. असे सांगून जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थिती दर्शविणार आहे. त्याकरिता गठीत समित्यांनी दिलेली कामे उत्कृष्टपणे पार पाडावी. तसेच एकमेकांशी समन्वय ठेवावा, जेणेकरून क्रीडा स्पर्धेचे नियोजन करणे सोयीचे होईल. स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजनासह उपाययोजना कराव्यात. खेळाडूंना ने-आण करणारी वाहने ट्रॅकवर येता कामा नये याबाबत दक्षता घ्यावी. स्पोर्ट असोसिएशन तसेच एनसीसीकडून स्वयंसेवकाची नियुक्त करावे. जेणेकरून, स्पर्धेच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करता येईल. मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता ठेवावी. स्वच्छता समितीने परिसर स्वच्छतेसोबतच भोजन परिसर, सैनिक शाळा, वनअकादमी या निवासी व्यवस्थेच्या ठिकाणची देखील स्वच्छता ठेवावी. याकरीता स्वच्छतेच्या टीम नेमाव्यात व स्पर्धेच्या आठवड्याभरापूर्वीच सर्व परिसर स्वच्छ करून घेण्याच्या सुचना संबधित यंत्रणाना दिल्या.

मदत कक्षाद्वारे प्रत्येक खेळाडूंना सर्व माहिती उपलब्ध होईल याअनुषंगाने व्यवस्था करावी. प्रत्येक समितीच्या नोडल ऑफिसरची माहिती मदत कक्षाकडे उपलब्ध असावी. २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मदत कक्ष तसेच टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवावा.

जिल्हाधिकारी गौडा पुढे म्हणाले, भोजन समितीने खेळाडूंच्या तसेच मान्यवरांच्या भोजनासाठी कुपननुसार व्यवस्था ठेवावी. कार्यक्रम सुरू असतांना समित्यांनी ऑनफिल्ड समन्वय ठेवावा. खेळाडूंना व मान्यवरांना निवासासाठी राखीव हॉटेलची यादी अद्यावत ठेवावी. येणाऱ्या खेळाडूंना पर्यटनासाठी ताडोबा व्याघ्र सफारी पुरतेच सीमित न ठेवता इतर ठिकाणीही पर्यटनाची व्यवस्था करावी. वाहतूक व्यवस्था समितीने खेळाडूंच्या निवास व्यवस्थेपासून तर संकुलापर्यंत ने-आण करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी समन्वय ठेवून नियोजन करावे असेही ते म्हणाले





  Print






News - Chandrapur




Related Photos