राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार?


वृत्तसंस्था / मुंबई :  राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर राष्ट्रवादीने तातडीने पुण्यातील रूपाली चाकणकर यांची नियुक्तीचा निर्णय घेतला घेतला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला. चित्रा वाघ येत्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्‍ट्रवादी काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्यांची रांग लागली आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शरद पवार यांचे निकटवर्तीय व माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनीही मतदारसंघाच्या भल्यासाठी भाजपची वाट पकडण्याचा इरादा व्यक्त केला आहे. पूर्वाश्रमीच्या अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या चित्रा वाघ याही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातानाचे त्यांचे छायाचित्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिसले. त्याच दिवशी रात्री चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा पाठवून दिला. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष ही दोन पदे महत्त्वाची असतात. या पदावरील दोन नेते सत्ताधारी भाजपच्या गळाला लागले आहेत. राष्ट्रवादीने डॅमेज कंट्रोल करण्याचा भाग म्‍हणून तातडीने या पदावर नवीन नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण, मुंबई अध्यक्षपदाबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या भूमिकेमुळे लांबणीवर पडला असल्याचे पक्षात बोलले जाते. पण, पक्षनेतृत्‍वाने तातडीने महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्‍ती केली आहे. चाकणकर यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-07-28


Related Photos