कंपनी क्रमांक ४ चा डीव्हीसी गोकुल मडावी सह ६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण


- चार महिला नक्षलींचा समावेश
- आत्मसमर्पीतांवर होते ३२ लाख ५० हजारांचे बक्षिस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
३२ लाख ५० हजारांचे बक्षिस असलेल्या सहा नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर  आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये डीव्हीसी गोकुल मडावी याच्यासह सहा नक्षल्यांचा समावेश असून चार महिला नक्षली आहेत. यापैकी एक महिला गर्भवती आहे. आत्मसमर्पीत नक्षल्यांचा अनेक घटनांमध्ये सहभाग असून वरीष्ठ नक्षल्यांच्या जाचाला कंटाळून आणि वरीष्ठांवरील विश्वास उडाल्याने या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया उपस्थित होते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये डीव्हीसी गोकुल उर्फ संजु सन्नु मडावी, रतन उर्फ मुन्ना भिकारी कुंजामी, सरीता उर्फ मुक्ती मासा कल्लो, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरीना उर्फ शांती दानू होयामी आणि मिना धुर्वा या नक्षलींचा समावेश आहे.
गोकुल उर्फ संजू मडावी (३०) हा नोव्हेंबर २००५ मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. २०१३ मध्ये कंपनी क्रमांक ४ मध्ये पीपीसीएम व २०१७ मध्ये कंपनी क्रमांक ४  च्या डीव्हीसी पदावर काम केले. त्याच्यावर १५ चकमकी, ३  खून, ६  ब्लास्टींगचे गुन्हे दाखल असून शासनाने ८  लाख ५० हजारांचे बक्षिस जाहिर केले होते.
रतन उर्फ मुन्ना भिकारी कुंजाम (२२) हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांन्ड्रा  दलममध्ये सहभागी झाला. २०१५ पासून एप्रिल २०१९ पर्यंत प्लाटून क्रमांक ११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. २०१७ मधील विजापूर घाट चकमक, २०१८ मधील आयपेंटा चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याचे कार्यक्षेत्र छत्तीसगड राज्यातील मद्देगड एरियात असल्याने त्याच्यावर छत्तीसगड राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर ५ लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.
सरीता उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०) ही २०१३ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत ती कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील वाहने जाळपोळीच्या गुन्ह्यासोबतच ३ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने ५ लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.
शैला उर्फ राजे मंगळु हेडो (२०) ही जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलम सदस्य म्हणून भरती झाली. फेब्रुवारी २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये   कार्यरत होती. तिच्यावर ३ चकमकीसह १ खून ३  जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने ४ लाख ५० हजारांचे बक्षिस जाहिर केले होते.
जरीना उर्फ शांती दानु होयामी (२९) ही ऑगस्ट २००४ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून सहभागी झाली. २००७ पासून आजपर्यंत ती भामरागड दलममध्ये ए.सी.एम. पदावर कार्यरत होती. तिच्यावर ८  चकमकीसह एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने ५ लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.
मिना धुर्वा (२२) ही जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलम सदस्य म्हणून भरती झाली. एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर ४ लाख ५० हजारांचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते.
दलममध्ये कार्यरत असताना महिलांवर होत असलेले अत्याचार तसेच दलममधील नक्षली गावात जावून अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेवून बळजबरीने दलममध्ये भरती करीत असल्यामुळे या नक्षल्यांचा वरीष्ठांवरील विश्वास उडाला होता. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम  भागाच्या विकासकामात आडकाठी आणणे असे कृत्य नक्षली करीत असल्याने आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून या नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निवडला आहे. या नक्षल्यांचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी पुष्पगुच्छ व दुपट्टा देवून स्वागत केले.
आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात सामिल होत असलेल्या नक्षल्यांना पोलिस दलाने भूखंड, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धता, नसबंदी रिओपनिंग सारख्या योजना राबविल्या आहेत. यामुळे नक्षली चळवळ सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-27


Related Photos