'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / ठाणे :
बदलापूर-वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफ, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळं हे बचावकार्य अवघ्या दोन ते अडीच तासांत पार पडले. 
मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळं 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. तब्बल १५ हे प्रवासी गाडीत होते. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास मदतकार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी सव्वादोनपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर १४ बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, लष्कर, पोलीस, रेल्वे, स्थानिक प्रशासन या सर्वांचे या बचावकार्यासाठी आभार मानले आहेत. 
'महालक्ष्मी एक्स्प्रेस'मध्ये सुमारे ७०० प्रवासी असल्याची माहिती आहे. त्यात नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांच्या जेवणाची व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळातच त्यांना बदलापूरला नेले जाणार असून तेथून मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवले जाणार आहे. 



  Print






News - Rajy | Posted : 2019-07-27






Related Photos