मुले पळविणारी टोळी समजून काँग्रेस नेत्यांना चोपले


वृत्तसंस्था / बैतुल :  लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून मध्य प्रदेशातील बैतुल येथे तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यामध्ये दोन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. 
बैतुलपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवल सिंघाना गावामध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली, अशी माहिती शाहपूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी दीपक पराशर यांनी दिली. बैतुल काँग्रेसचे सरचिटणीस धर्मेंद्र शुक्ला, स्थानिक काँग्रेस नेते धरमूसिंह लांजीवार आणि स्थानिक आदिवासी नेते ललित बरास्कर यांचा मारहाण झालेल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. 
शाहपूर ते केसियादरम्यान ते मध्यरात्रीच्या सुमारास कारने प्रवास करीत होते. लहान मुलांना पळविणारी टोळी रात्रीच्या सुमारास कार्यरत असते, अशा अफवा या भागात पसरलेल्या होत्या. कारमधून या टोळीचे सदस्यच प्रवास करीत आहेत, अशी शंका आल्यामुळे गावकऱ्यांनी झाडाच्या फांद्या आडव्या टाकून रस्ता अडविला होता. रस्ता अडविण्याचे काम दरोडेखोरांचे आहे, असे समजून कारचालक यू-टर्न घेऊ लागला. कारमध्ये मुले पळविणारी टोळीच आहे, असा गैरसमज गावकऱ्यांचा झाला. गावकऱ्यांनी गाडी अडविली आणि कारमधून बाहेर काढून त्यांना बेदम चोपले. मारहाणीत तिघेही जखमी झाले असून, कारचेही प्रचंड नुकसान झाले आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-27


Related Photos