महत्वाच्या बातम्या

 तलाठी परीक्षेत चुकले ११४ प्रश्न, उमेदवारांना मिळणार पूर्ण गुण : भूमी अभिलेख विभागाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : तलाठी भरती परीक्षेत प्रश्नसुचीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपांनुसार तब्बल ११४ प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले असून ३२ प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले आहेत. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

राज्यात ४ हजार ४४६ तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवार परीक्षेला बसले होते. अर्जांची संख्या जास्त असल्याने भूमी अभिलेख विभागाने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पहिला टप्पा १७ ते २२ ऑगस्ट, दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर तर तिसरा टप्पा ४ ते १४ सप्टेंबरमध्ये राबविण्यात आला. त्यासाठी परीक्षेची एकूण ५७ सत्रे घेण्यात आली.

उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप प्राप्त झाले. यापैकी ९ हजार ७२ आक्षेप मान्य करण्यात आल्याची माहिती नरके यांनी दिली. त्यात १४६ प्रश्नांचा समावेश होता. त्यातील ३२ प्रश्नांचे प्रश्नसुचीतील पर्याय बदलण्यात आले. तर ११४ प्रश्न किंवा उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नरके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पेसा क्षेत्रातील जागांबाबत अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आलेले नाहीत. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली असून अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसुचीही प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Rajy




Related Photos