शहीदांचा त्याग, समर्पण वाया जाऊ न देण्याचा प्रण करू या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- कारगिल विजय दिनानिमित्त शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून
- मुख्यमंत्री फडणवीस यांची शहीदांना मानवंदना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई  :
कारगिल विजय दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले तसेच मानवंदना दिली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेश वहीत भावना नोंदविल्या. ते म्हणतात, ‘कारगिल विजयदिन’ हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आपल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा क्षण आहे. या शहीदांनी आपल्या भविष्यासाठी त्यांचा आज म्हणजे वर्तमान त्यागले आहे, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल. शहीदांचा त्याग आणि समर्पण वाया जाऊ न देण्याचा प्रण करावा लागेल. त्यासाठी आपल्याला, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करू या.’ भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौसेना यांच्यावतीने कुलाबा लष्करी तळाच्या  प्रांगणात हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तिन्ही दलांच्या सशस्त्र तुकड्यांनी शहीद स्मारकास मानवंदना दिली. यावेळी लेफ्टनंट जनरल एस. के. प्राशर, व्हाईस अॅडमिरल अजितकुमार पी. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-26


Related Photos