महाराष्ट्रात ४१५ आयएएस आणि ३१७ आयपीएस अधिकारी , दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्रशासकीयसोयीसाठी आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे समजल्या जाणा-या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) ४१५ आणि भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस ) ३१७ अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत.
गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार २०१६ ते २०१८ या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिका-यांच्यापदांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिका-यांची संख्या ३६१ हून वाढून ४१५ झाली आहे तर आयपीएस अधिका-यांची संख्या ३०२ हून वाढून ३१७ झाली आहे. प्रधानमंत्री कार्यालय तथा कर्मचारी ,जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली .
केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशातील आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत वर्ष २०१६ ते २०१८ दरम्यान देशातील एकूण १० राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण २ हजार ७१० आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत ३६१ हून ४१५ एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे.
वर्ष २०१६ ते २०१८ दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातील एकूण १३ राज्यांमधील आयपीएस अधिका-यांच्या पदांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण २ हजार २७७ आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिका-यांच्या संख्येत ३०२ हून ३१७ एवढी वाढ झाली आहे.
News - Rajy | Posted : 2019-07-25