महत्वाच्या बातम्या

 उसापासून निर्मित इथेनॉलवर केंद्राची बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे उसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरींना दिले.

उसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य कठीण होईल. इथेनॉल निर्मितीमुळे गतवर्षी साखर उत्पादन ४१ लाख टनांनी घटले, पण आता २१ लाख टनांची भर पडून उत्पादन २९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.

देशात सुमारे ४५० इथेनॉल प्रकल्पांत साखर उद्योग आणि डिस्टिलरीजनी सुमारे ७० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयाने ही गुंतवणूकच गोत्यात आली आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची दरवाढ होऊन ग्राहकांचा रोष ओढवणे केंद्र सरकारला परवडणारे नसल्याने हा निर्णय घेतल्याची म्हटले जात आहे. ज्या बँकांनी इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज दिले आहे. त्याची परतफेड कशी करायची? साखर उद्योगाबरोबरच कर्ज देणाऱ्या बँकाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आदेशात काय म्हटले आहे?

- साखर नियंत्रण आदेशातील खंड ४ आणि ६ अन्वये इथेनॉल निर्मिती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- उसाचा रस आणि बी-हेवी मोलासेसपासून तयार केलेले इथेनॉल तेल विपणन कंपन्यांनी खरेदी करू नये, असेही म्हटले.

- सी-हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला आणि मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे.

७९ टक्के इथेनॉल साखर उद्योगातून -

इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता १.३६४ कोटी लिटरची आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या वर्षात देशात ५०० कोटी लिटरचे उत्पादन झाले आहे, यातील ७९ टक्के वाटा साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलचा आहे. यामुळे पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करता आले.

१६ लाख टन साखरच इथेनॉलकडे जाणार -

चालू हंगामात ३५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल, असा अंदाज होता. मात्र, १५ ते १६ लाख टन साखर वापरली जाईल.





  Print






News - World




Related Photos