महत्वाच्या बातम्या

 आता पाचवी व आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा : नापास झाल्यास त्याच वर्गात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल.

मात्र, तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाईल. हा बदल २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून लागू राहणार आहे.

दोन्ही इयत्तांसाठी प्रत्येक विषयासाठी ५० ते ६० गुणांसाठी ही परीक्षा होईल. भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. कला, कार्यानुभव आदी इतर विषयांकरिता सध्या प्रचलित असलेले आकारिक मूल्यमापन केले जाईल. इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस म्हणजे एप्रिल महिन्यात होईल आणि इतर इयत्तांसमवेत यांचा निकाल जाहीर केला जाईल. किमान ३५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील.

२०१० पासून शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धती बंद करण्यात आली. मात्र, यामुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे राहतात, अशी ओरड सर्वत्र होऊ लागल्याने पाचवी आणि आठवी करता पुन्हा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुनर्परीक्षाही मूळ परीक्षेनुसारच -

परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण दिले जातील. मात्र, तरीही तो एक किंवा एकाहून अधिक विषयांत अनुत्तीर्ण होत असेल तर पुनर्परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केले जाईल. पुनर्परीक्षाही मूळ परीक्षेनुसारच असेल. विदर्भ वगळता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येईल. पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीत प्रवेश द्यायचा असल्यास पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.





  Print






News - Rajy




Related Photos